आपलं .....
काल बऱ्याच दिवसांनी पुण्याला गेलो. बरीच काम होती.
उरकता उरकता रात्रीचे साडे नऊ वाजले कसे हेही कळले नाही.
त्यामुळे बसपास असूनही शिवाजीनगर ST स्टॅन्डला रिक्षानेच गेलो.
राजगुरूनगरला जाणारी पुणे नाशिक बस लागलेलीच होती.
पण तुडुंब!!
म्हटलं आता पुढची शेवटची बस अर्ध्या तासाने.
बाकड्याकडे वळणार तोच बसमधून ' ओ काका ' असा आवाज आला.
मी आवाजाच्या रोखाने पाहिले.
एक विशी बावीशीतील रुपयौवना माझ्याकडेच पाहत होती.
उजव्या हाताची चार बोटे दोनदा छातीवर ठेऊन " मला आवाज दिलाय का " असं न बोलताच विचारलं.
" हो, तुम्हालाच की ".
मग मात्र दारातील पाशींजारांना मुश्किलीने हटवत ती बसली होती तिथे पोहोचलो.
स्वतः बाजूला होऊन खिडकीतली जागा तिने मला रिकामी करून दिली.
थॅंक यु असं म्हणून मी जागेवर विसावलो आणि बस सुरु झाली.
दिवसभरातील तकतकीने असेल, माझा लगेच डोळा लागला.
पण शेजारी बसलेल्या त्या रुपगर्वितेचा विचार सबकॉन्शस मनात होताच.
चाकण जवळ आलं तसा जागा झालो.
तिच्याकडे बघून स्मित केलं, तशी ती म्हणाली " प्रकाश ओगले तुमचे लहानपणापासूनचे मित्र ना! "
मी विस्मयानेच हो म्हणून मान डोलवली.
" त्यांची मी धाकटी मुलगी! प्रज्ञा! हिंजवडीला आहे माझं ऑफिस! निगडीला काकूकडे राहते.
दोन दिवस सुट्टीला जोडून रजा घेतलीय.
आणि घरी चाललेय नाशिकला. "
इतका वेळ अंग चोरून एटिकेट्स सांभाळत बसलेला मी थोडा आरामशीर झालो.
म्हटलं " तुझे वडील आणि मी जीवन शिक्षण मंदिर म्हणजे अगदी पहिल्या यत्तेपासून 15-16 वर्ष एकत्र होतो. अभ्यास, खेळ आणि गप्पांचे ते बालपण तू आठवणीत आणून दिलेस. आता जशी नाशिकला चाललियस तसं एक हक्काचं ठिकाण आता राजगुरुनगरला ही आहे हे मात्र लक्षात ठेव.
तिथली तुझी काकूही तुझे अप्रूप असणारी आहे हे तुला कळेलच!!
......आणि मला एक प्रश्न पडलाय!
तू पुणे स्टेशनवर मला ओळखलस कसं?
ती म्हणाली " काका, वडलांच्या लग्नाचा अलबम आमच्याकडे आहे. त्यात तुमचा दोघांचा मुद्दामहून काढलेला एक फोटो आहे.
हा कुणाचा असे विचारल्यावर ते तुमचं नाव उच्चारून खूप आनंदी झाल्याचं मी पाहिलय.
आणि स्टेशनवर असताना एक दोघांनी तुम्हाला हाक मारली म्हणून ते तुम्हीच हे कन्फर्मही झालं.
तुम्ही मागे वळत असताना मी पर्स ठेवलेली जागा गाडी पूर्ण भरलेली असूनही रीकामी राहिली होती म्हणून मी हाक मारली.
........एरव्ही कुणी अनोळखी तरुणी शेजारी बसल्यावर असणारी मानसिकता आणि आताची - यात खूप फरक होता.
आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं हे नातं काही क्षणात दाट होतं नाही!! आणि त्याला जपणं हा मग सहजभावच बनतो. तो अत्त्युच्च पातळीचा असतो हे मात्र खरे!
*ले. प्रमोद गानु
*ले. प्रमोद गानु