मंगळवार, १६ मे, २०१७

राजगुरूनगर ... राजगुरूनगर !!!

*राजगुरूनगर*
आमच्या गावाचं नाव खेड होतं हो.
जुनी लोकं हे गाव खूप जुन्या काळापासून वसलेलं म्हणून सांगायची.
खेटक ग्राम असा उल्लेखही केला जायचा शिवकाळाच्याही आधीपासून.
गावाबाहेरच्या ओढ्यावर घातलेला घडीव दगडाचा बांध " दिलावर धरण " म्हणून ओळखला जायचा.
24 वाड्यावस्त्या असणारं हे गाव जसं भिकार नव्हतं तसं समृद्धही नव्हतं फारसं.
 जेऊनखावून सुखी असणारी आणि स्वभावतःच गरजा कमी असणारी माणसं असेल त्या परिस्थितीत पण समाधानानं राहत होती.
 शेजारी चांगल्यापैकी व्यापार उदीम असणारी चाकण, मंचर, नारायणगाव सारखी गावं होती.
पण आमचं गाव तसही नावाजलेलं नव्हतं.
तालुक्याचं गाव म्हणून कोर्टकचेऱ्या आणि मुद्द्याची सरकारी कार्यालयं होती हे वैशिष्ठय.

... गावातल्या मारुतीच्या देवळात एक अवलिया कीर्तनकार मनात इथं सप्ताहभर कीर्तन करायचं ठरवूनच मुक्कामी आला.
गावातल्या, वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बोलावून त्याचा विचार त्याने त्यांच्यापुढे मांडला.
गाव पुढारी आनंदाने तयार झाले.
तसाही टुरिंग टॉकीज सोडली तर करमणुकीच्या दृष्टीने आनंदच होता. नाही म्हणायला यात्रा जत्रेत होणारे तमाशे फारतर.

कीर्तने सुरू झाली.
पण या बाबाची कीर्तने वेगळीच होती.
नुसतच विट्ठल विठ्ठल नाही तर त्याबरोबर धर्मवीर संभाजी, नेताजी सुभाष बाबू, चंद्रशेखर आझाद, नाना पाटील यांची आख्याने रंगू लागली.
एरवी कीर्तन म्हटलं की रात्रीची डुलक्या घेत, पेंगत बसणारी मंडळी या अख्यानांमध्ये सरसावून मांड्या घालून ताठ बसून लक्ष देऊन ऐकू लागली.

बोल बोल म्हणता सात दिवस निघून गेले.
शेवटच्या दिवशी भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू या तीन क्रांतिकारकांच्या बलिदानाचा विषय त्याने फारच बहारीचा रंगवला.
सँडर्सला राजगुरू गोळ्या घालतो तो प्रसंग म्हणजे त्या किर्तनकाराच्या अभिनय संपन्नतेचा उत्कट अविष्कार होता.
कीर्तन संपवताना किर्तनकाराने जमलेल्या सर्व नागरिकांना खडा सवाल टाकला.
" स्वातंत्र्याच्या वेदीवर आपले शिरकमल वाहणारा पट्ठ्या हुतात्मा शिवराम राजगुरू तुमच्या गावात जन्म घेतलेला. आणि तुमच्या गावाचं नाव खेड व्हय? अरे थूत या जिंदगीवर!! आता हे गाव राजगुरूनगरच व्हायला हवं. "

झालं,
 अख्खी तरुणाई त्या प्रवचनकाराबरोबर गोळा झाली.
त्या सप्ताहानंतर लगोलग काही दिवसातच गाड्या भरून मंडळी मुंबईला मंत्रालयात गेली.
पंचक्रोशीतले पुढारी , आमदार, खासदार, गावातल्या वजनदार असामी सगळे वेठीला धरले.
सगळ्या गावाने एकमतानेच मनावर घेतले.
आणि शासनानेही आवश्यक त्या पूर्तता करून खेड हे नाव पुसून गावाला राजगुरूनगर हे अभिमानास्पद नाव दिले.
 यथावकाश गॅझेटमध्येही त्याची नोंद झाली.
इथं महत्वाचं सांगायचं म्हणजे चांगली गोष्ट होणं ही चांगलीच बाब असते. सर्वानाही ते व्हावं असं वाटत असतं.
पण कोणीतरी योजक असावा लागतो.
*योजकस्तत्रदुर्लभः हे उगीचच बनलेलं सुभाषित नाहीये!!
***************************************
तळ टीप :-. काही मित्रांनी ह्या पोस्टमध्ये वर्णन केलेले कीर्तनकार कोण अशी पृच्छा केली. मला तर नाव काही केल्या आठवत नव्हते. पण ते कीर्तनकार रामदासी संप्रदायाचे होते हेच लक्षात होते. त्यावेळी बाई दीक्षित यांच्याकडे गीता जयंतीस येणारे अनंतदास रामदासी (उपाख्य, धेनुदास डोळे ) हेच त्यावेळी मारुती मंदिरात कीर्तन केलेले रामदासी कीर्तनकार हे नक्की झाले.
*************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा