गुरुवार, १८ मे, २०१७

पुनश्च.

काल संध्याकाळी बँक आणि इतर कामासाठी बाहेर गेलेली माझी पत्नी घरी आली ती एका तिशीतल्या युवतीबरोबर!!

"आज ही मुक्कामाला इथे थांबणार आहे"
दरवाजा उघडायला आलेल्या मला पत्नीने  थोडक्यात ब्रिफ केलं
आणि दोघीं पत्नीच्या लेखन खोलीकडे मार्गस्थ झाल्या.
 दरवाजा बंद करून मीही सनराईझ विरुद्ध रायडर्स लावून बसलो पाहत.
इथे पाऊस नसला तरी सनराईझची फलंदाजी संपताच तिथे पाऊस सुरू होऊन मॅच थांबली.
आणि थोडा वेळ बातम्यांचे चॅनेल उडते सर्फ करून भारत सध्या कठीण कालखंडातून जात आहे आणि निदान आपण तरी त्यास जबाबदार नाही असे मनाला बजावत लवकर निद्राधीन झालो.

                          सकाळी उठून किचनमध्ये चहासाठी आलो तर तिथे वेगळेच दृश्य होते.
दोघींनी सगळे किचन आवरून स्वैपाकही करून ठेवला होता.
 त्या मुलीने " काका नमस्कार, काल तुमच्याशी दोन शब्दही बोलता आले नाहीत. कारण तुम्ही मॅच पाहत होता. आणि तुम्हाला डिस्टर्ब करणं बरोबर झालं नसतं."
 मी ही " its ok" अस म्हणून पुढे जास्त बोललो नाही.
 ती मुलगी तिचं  आवरून ' काकू मी निघते आता ' म्हणून काकूंचा आणि माझा निरोप घेऊन पुण्यास जाण्यासाठी बाहेर पडली.

                   तिला निरोप देऊन आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो.
 पत्नीने मी न विचारताच " गानु शेठ, या मुलीची कथा तुम्हाला सांगितली पाहिजे " अशी प्रस्तावना करून जे काही सांगितलं ते असं ...

  पुण्याला पत्नीच्या मावसबहिणी शेजारी राहणारे एक ( कदम हे आडनाव देऊया आपण त्यांना ) उच्चभ्रू मराठा कुटुंब.
त्या मुलीच्या आईचे आणि सौ. गानु यांचे सख्य.
कारण साहित्य व लेखनाची आवड.
या मुलीचे लग्न चांगले घराणे पाहून वयाच्या 22 व्या वर्षीच आई वडिलांनी करून दिलेले.
 लग्न झाल्यावर काही दिवसातच कळले की त्या मुलाचे पहिले लग्न झालेले आहे.
त्याची बायको छळवादामुळेच यांच्याजवळ राहत नाही.
तिला एक चार वर्षाचा मुलगाही आहे.
 ...कदमांची मुलगी घरी परत आली.
 काही इलाजच नव्हता.
कारण असा उसना प्रपंच करणं , आणि तोही आयुष्यभर?
केवळ दुरापास्त.
 मग ही मुलगी घरी रडत बसली नाही.
नोकरी करून  शेतकी कॉलेजातील राहिलेली दोन वर्षे तिने पुरी केली.
 B.Sc. (Agri.) झाली तेही विशेष नैपुण्यात (distinction).

आज त्या मुलीचं वय 29 आहे.
 आता तिला मिळालेली नोकरीही गुणवत्तेनुसार चांगल्या वेतनाची मिळालीय.
तरीही स्मार्ट, निगर्वी आणि कामसू असलेली ही मुलगी जीवनात अधिक यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
मागे काय घडलं याबद्दल खंत न बाळगता तिने आयुष्य पुन्हा योग्य चाकोरीवर आणून ठेवलंय.

काल तिला कॅज्युअली घेणारा मी आज तिची माहिती कळल्यावर निश्चितच प्रभावित झालो आहे.
 कुठल्याही समाजाला मार्गदर्शन करण्याची माझी लायकी अगर कुवत नाही.
पण जे घडलंय, आपल्याला कळलंय ते चार जणांपुढे गेलं पाहिजे यासाठी हे लिहिलंय.
 बाकी सूज्ञ तर तुम्ही आम्ही सगळेच असतोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा